काशिनाथ शिंदे : पिंपरी
काळेवाडी पोलिसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा अवघ्या सहा तासांत छडा लावत सराईत घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना आणि एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. आरोपींकडून ₹१,०८,९७० किमतीचा चोरीचा मुद्देमाल तसेच एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
२६ जुलै रोजी मध्यरात्री काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
या कारवाईत कैलास अशोक खलसे (वय ४०) आणि शुभम शांताराम दुबे (वय २७) यांना अटक करण्यात आली. तसेच एका विधिसंघर्षित बालकाचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक सुरेंद्र धुमाळ तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.







