२५० कर्मचारी, २० मोठी अग्निशमन वाहने तैनात; २४ तास गस्त, सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
काशिनाथ शिंदे
पिंपरी : दिवाळीचा सण सुरक्षित वातावरणात साजरा व्हावा आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह विद्युत रोषणाईमुळे होणाऱ्या संभाव्य आगीच्या दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज झाला आहे. शहरातील २२ संवेदनशील ठिकाणे निश्चित करून या परिसरांमध्ये विशेष गस्त घालण्यात येणार आहे. तब्बल २५० कर्मचारी, २० मोठी अग्निशमन वाहने आणि गस्ती वाहनांच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवले जाणार आहे.
दिवाळीच्या काळात बाजारपेठांमधील गर्दी, फटाक्यांची आतषबाजी, विद्युत रोषणाई आणि दिव्यांच्या वापरामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. मागील वर्षी दिवाळीदरम्यान शहरात आगीच्या सुमारे ७० घटना घडल्या होत्या. या घटनांचा अभ्यास करून यंदा संभाव्य धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार अग्निशमन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या नियंत्रणाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले आणि श्रीकांत वैरागर यांच्याकडे मोहिमेच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.
अग्निशमन विभागाचे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार असून, दिवाळीच्या कालावधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार आहे.
शगुन चौक, फुगेवाडी, पिंपळे गुरव, लांडगे नाट्यगृह परिसर, मॅगझिन चौक, त्रिवेणीनगर, तापकीर चौक, चिंचवड लिंक रोड, वाकड, दत्त मंदिर रस्ता, डांगे चौक, जगताप डेअरी, रावेत आणि मुकाई चौक यांसह अन्य संवेदनशील परिसरांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. लहान वाहनांद्वारे नियमित गस्त घालण्यासोबतच मोठी अग्निशमन वाहनेही तातडीच्या कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
फटाके फोडताना काळजी घ्या; अग्निशमन विभागाचे आवाहन
दिवाळीचा आनंद साजरा करताना नागरिकांनी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नये. गर्दीच्या ठिकाणी, इमारतींजवळ किंवा वाहनांच्या परिसरात फटाके फोडू नयेत. फटाके पेटवल्यानंतर न फुटल्यास पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. नायलॉन किंवा कृत्रिम कपड्यांऐवजी सुती कपडे वापरावेत. गॅस सिलिंडर, विद्युत तारा, पेट्रोल-डिझेल तसेच ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहून फटाके फोडावेत.
फटाके फोडताना जवळ पाण्याची बादली किंवा अग्निसुरक्षेची साधने ठेवावीत. लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावे. घरात, वाहनांमध्ये किंवा कचऱ्याजवळ फटाक्यांचा साठा करू नये. आग लागल्यास स्वतःहून धोका पत्करण्याऐवजी तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य!
“दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता ही महानगरपालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागाला आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्रीसह सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि आनंदी व सुरक्षित दिवाळी साजरी करावी.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
२२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष
“मागील वर्षातील घटनांचा अभ्यास करून शहरातील २२ संवेदनशील ठिकाणे निश्चित केली आहेत. २५० कर्मचारी, २० मोठी अग्निशमन वाहने आणि गस्ती वाहनांच्या माध्यमातून २४ तास दक्षता ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनीही फटाके फोडताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि दुर्घटना घडल्यास तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.”
— व्यंकटेश दुर्वास, मुख्य अग्निशमन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन केंद्रांशी संपर्क साधा
अग्निशमन केंद्र संपर्क क्रमांक
पिंपरी (मुख्य) ९९२२५०१४७५
भोसरी ९९२२५०१४७६
प्राधिकरण ९९२२५०१४७७
रहाटणी ९९२२५०१४७८
चिखली ८६६९८९४१०१
आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन केंद्रांशी संपर्क साधा
अग्निशमन केंद्र संपर्क क्रमांक
पिंपरी (मुख्य) ९९२२५०१४७५
भोसरी ९९२२५०१४७६
प्राधिकरण ९९२२५०१४७७
रहाटणी ९९२२५०१४७८
चिखली ८६६९८९४१०१
तळवडे ९५५२५२३१०१
थेरगाव ७०३०९०७९९९
मोशी ७२६४९४३३३३
चोवीसावाडी ७७५८९९२८१७
नेहरूनगर ८४८४८८४१०१






