स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल; लोकसहभाग, प्रशासकीय समन्वय आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ठरला ठसा
काशिनाथ शिंदे
पिंपरी: स्वच्छता व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाच्या जोरावर पिंपरी-चिंचवड शहराने राष्ट्रीय स्वच्छता अभियानात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील महापालिकेच्या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
महापालिकेचे नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, स्वच्छता सेवकांचे अथक परिश्रम आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या सामूहिक प्रयत्नांतून शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे.
महापौर रवि लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या माध्यमातून शहरात विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. कचरा विलगीकरण, ओला-सुका कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जनजागृती मोहिमा तसेच पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या आर.आर.आर. केंद्रांच्या माध्यमातून स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.
विशेष म्हणजे, स्वच्छता अभियान केवळ मोहिमेपुरते मर्यादित न ठेवता नागरिकांच्या दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था, स्वच्छता सेवक आणि नागरिकांना सहभागी करून घेतले जात आहे.
विभागीय समन्वयातून स्वच्छतेला बळ
शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला व्यापक स्वरूप देण्यासाठी आरोग्य विभागासह जलनिस्सारण, पाणीपुरवठा, स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आणि उद्यान विभाग समन्वयाने काम करीत आहेत. सार्वजनिक सुविधांची देखभाल, पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विविध विभागांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि सफाई सेवक यांच्या नियोजनबद्ध कामामुळे स्वच्छता उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता राखण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत असलेल्या सफाई सेवकांचे योगदान या कामगिरीचा महत्त्वाचा आधार ठरत आहे.
नागरिकांचा सहभाग हीच स्वच्छतेची खरी ताकद
कचऱ्याचे योग्य विलगीकरण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविणे, अशा विविध माध्यमांतून नागरिकही स्वच्छता अभियानात योगदान देत आहेत. प्रशासन आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांतून स्वच्छतेला सामूहिक जबाबदारीचे स्वरूप प्राप्त होत आहे.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ आणि सुंदर शहर ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. राष्ट्रीय स्तरावर मिळणारा गौरव हा शहरातील नागरिक, स्वच्छता सेवक आणि महापालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे. शहराच्या स्वच्छतेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.”
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरी ही नियोजनबद्ध कार्यपद्धती, प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाची पावती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि सातत्यपूर्ण जनजागृतीवर प्रशासनाचा भर आहे. राष्ट्रीय स्तरावरील हा गौरव अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.”
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण, कचरा व्यवस्थापनातील सुधारणा आणि जनजागृतीचे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याचे सांगितले. तर उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी कचऱ्याचे योग्य विलगीकरण, नियमित संकलन आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यांसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले.
स्वच्छतेच्या क्षेत्रातील ही कामगिरी म्हणजे केवळ पुरस्कारापुरती मर्यादित उपलब्धी नसून प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता सेवक आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांना मिळालेली राष्ट्रीय स्तरावरील पावती आहे. आगामी काळातही स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडला स्वच्छ शहर म्हणून अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.






