आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांशी डॉ. विजय सूर्यवंशी व डॉ. आरती सूर्यवंशी यांचा जिव्हाळ्याचा संवाद; आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा दिला मंत्र
काशिनाथ शिंदे
पिंपरी : दिवाळीचा आनंद केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा संवेदनशील उपक्रम पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांनी राबविला. आळंदीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोयाळी फाटा येथील ‘स्नेहवन’ संस्थेला भेट देत त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली. मुलांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी टॅब भेट देण्यात आले. या भेटीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर त्यांच्या स्वप्नांना नवे बळ मिळाले.
अशोक देशमाने आणि त्यांच्या पत्नी अर्चना देशमाने यांच्या पुढाकारातून स्नेहवन संस्थेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण आणि संगोपन केले जाते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि डॉ. आरती सूर्यवंशी यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची पाहणी केली. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना ज्ञानाची नवी दालने खुली व्हावीत, या उद्देशाने टॅबची भेट देण्यात आली. ही भेट केवळ एक उपकरण नसून मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले.
आत्मविश्वास गमावू नका; शिक्षणाची वाट कधीही सोडू नका!
या भेटीतील विशेष आकर्षण ठरला तो आयुक्त दाम्पत्याचा मुलांशी झालेला मनमोकळा संवाद. मुलांनी आयुक्तांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी, सरकारी अधिकारी होण्यासाठी केलेला संघर्ष, महापालिकेचे कामकाज आणि नागरिकांची कामे कशा पद्धतीने मार्गी लावली जातात, याबाबत अनेक प्रश्न विचारले.
डॉ. सूर्यवंशी यांनीही मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला आपुलकीने उत्तरे दिली. बालपणीच्या विट्टी-दांडू, सुरपारंब्यासारख्या खेळांच्या आठवणी सांगत त्यांनी आपल्या प्रशासकीय प्रवासाचा पट उलगडला. आर्मी ऑफिसर म्हणून झालेली निवड, त्यानंतर कस्टम अधिकारी, सहकार विभागातील काम, कोल्हापूर आणि रायगड येथील प्रशासकीय जबाबदाऱ्या, जिल्हाधिकारी आणि पुढे महानगरपालिका आयुक्तपदापर्यंतचा प्रवास त्यांनी मुलांसमोर मांडला.
शिक्षण घेताना अडचणी येऊ शकतात; मात्र आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण थांबवू नका. रोज काहीतरी नवीन शिका, नियमित अभ्यास करा आणि वाचनाची सवय जोपासा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि सातत्य महत्त्वाचे आहे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
सरकारी सेवेतील अनुभव सांगताना त्यांनी नागरिकांच्या सेवेला प्राधान्य देण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. आपल्याकडे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटले पाहिजे. गरजू लोकांची मदत करून त्यांची कामे मार्गी लावणे, हाच प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याचा दृष्टिकोन असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मुलांनी त्यांच्या वाचनाच्या आवडीबरोबरच त्यांनी वाचलेली पुस्तके आणि टेस्लासारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींविषयीही उत्सुकतेने प्रश्न विचारले. मुलांची जिज्ञासा आणि ज्ञान मिळविण्याची ओढ पाहून आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले. मुलांच्या आयुष्यातील संघर्षाच्या कहाण्या जाणून घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
‘कठीण काळ कायम राहत नाही’; शेतकरी कुटुंबांना भावनिक आवाहन
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर बोलताना डॉ. सूर्यवंशी यांनी भावनिक आवाहन केले. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. आपल्या कुटुंबाचा आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करावा. कोणताही वाईट काळ कायम राहत नाही. धैर्याने आणि संयमाने परिस्थितीला सामोरे जाणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
‘छत्र हरवले, तरी स्वप्नांना आकाश देता येते!’
डॉ. आरती सूर्यवंशी यांनीही मुलांशी संवाद साधत त्यांच्या जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले. आयुष्यातील छत्र हरवले असले, तरी प्रत्येकाच्या मनात एक दुर्दम्य शक्ती असते. ती ओळखून जागृत केली पाहिजे. प्रत्येक समस्येवर उत्तर असते; गरज असते ती ते शोधण्याच्या जिद्दीची, असे त्यांनी सांगितले.
स्नेहवनसारख्या संस्था शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी पुढाकार घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे. योग्य शिक्षण, चांगले संस्कार आणि प्रेमळ वातावरण मिळाल्यास हीच मुले उद्याच्या भारताचे सक्षम आणि जबाबदार नागरिक बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी मुलांनीच संपूर्ण शाळा आणि विविध प्रयोगशाळांची माहिती आयुक्त दाम्पत्याला दिली. मुलांचा आत्मविश्वास, विषयांची जाण आणि संवादकौशल्य पाहून डॉ. आरती सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले. या मुलांमध्ये भविष्यातील सनदी अधिकारी, माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ, पत्रकार आणि मानसशास्त्रज्ञ घडण्याची क्षमता आहे. त्यांच्या भविष्यातील प्रगतीचा प्रवास पाहण्याची उत्सुकता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
स्नेहवनमध्ये शिक्षणासोबत स्वावलंबनाचेही धडे!
स्नेहवनमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील मुलांचे संगोपन केले जाते. येथे केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. संस्थेत गोशाळा, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, मुलांसाठी खुली व्यायामशाळा, कौशल्य विकास केंद्र, बेकरी व्यवसाय प्रशिक्षण अशा सुविधा उपलब्ध आहेत.
याशिवाय विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी १५ प्रकारच्या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. एमपीएससी-यूपीएससी प्रशिक्षण केंद्र, विज्ञान प्रयोगशाळा आणि कंटेनर ग्रंथालयाच्या माध्यमातून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बाबा आमटे यांच्या हस्ते संस्थेच्या परिसरात लावण्यात आलेले पेरूचे झाडही या संस्थेच्या कार्याशी जोडलेली एक भावनिक आठवण आहे.
विशेष म्हणजे, संस्थेतील मुलांनीच प्रत्येक प्रयोगशाळेची रचना, तेथे होणारे प्रयोग, विविध प्रकल्प आणि त्यामागील उद्देश आयुक्त दाम्पत्याला समजावून सांगितले. मुलांची जिज्ञासा, ज्ञानाची ओढ आणि आत्मविश्वास पाहून आयुक्त दाम्पत्य भारावून गेले.
दिवाळीच्या निमित्ताने झालेली ही भेट मुलांसाठी केवळ आनंदाची पर्वणी ठरली नाही, तर शिक्षण, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणाही देऊन गेली.






