चिंचवड पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली २९ ग्रामरक्षक दल सदस्यांची उल्लेखनीय कामगिरी
काशिनाथ शिंदे
चिंचवड : गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी पोलिसांना सक्रिय सहकार्य करत बंदोबस्ताची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडण्यासाठी सुमारे २९ ग्रामरक्षक दल सदस्यांनी विविध ठिकाणी योगदान दिले.
पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांच्या नियोजनानुसार ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी गणेशोत्सवातील विविध बंदोबस्ताची कामे पार पाडली.
ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर यांच्या हस्ते जर्किनचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे सर्व सदस्य एकसमान गणवेशात पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तात सहभागी झाले. गर्दीचे नियोजन, वाहतूक सुरळीत ठेवणे, गणेश मंडळांना आवश्यक सहकार्य करणे तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांना मदत करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
ग्रामरक्षक दलाच्या नियोजनात ज्येष्ठ सदस्य सुभाष मालुसरे, धनंजय कुलकर्णी, सतीश भारती, राकेश रायकर, वसंत ढवळे, प्रकाश मिर्झापुरे आणि उदय वाडेकर यांनी विशेष पुढाकार घेतला. या कामी एलआयबीचे सागर आढारी आणि संतोष उभे यांचेही सहकार्य लाभले.
अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सुमारे २५ ग्रामरक्षक दल सदस्यांनी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभाग घेतला. नागरिकांची सुरक्षितता, गर्दीचे नियंत्रण आणि मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी पोलिसांसोबत समन्वय साधला.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामरक्षक दलाने दिलेल्या सहकार्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले. पोलीस प्रशासन आणि ग्रामरक्षक दल यांच्यातील प्रभावी समन्वयातून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम उल्लेखनीय ठरला.






