पद्मश्री दादा इधाते यांचे प्रतिपादन; चिंचवडमध्ये तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन
काशिनाथ शिंदे
पिंपरी: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी सुरू केलेल्या क्रांतिकारी कार्याला आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांनी संरक्षण आणि पाठबळ दिले. तसेच वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या जडणघडणीतही लहूजी वस्ताद यांचे मोलाचे योगदान होते, असे प्रतिपादन पद्मश्री दादा इधाते यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर करणाऱ्या तीन दिवसीय क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटनही करण्यात आले. या प्रसंगी पद्मश्री दादा इधाते मार्गदर्शन करताना बोलत होते.
लहूजी वस्ताद यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि परिवर्तनाच्या विचारांसाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक क्रांतिकारक आणि समाजपरिवर्तनाचे नेतृत्व करणारी व्यक्तिमत्त्वे घडली. त्यामुळेच त्यांना ‘आद्य क्रांतीगुरू’ म्हणून ओळखले जाते. अशा महापुरुषांचे कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी जयंती उत्सव आणि विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे, असेही दादा इधाते यांनी नमूद केले.
या अभिवादन कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, महेश लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, जेजुरी संस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, नाना कांबळे, संजय धुतडमल, नितीन घोलप, युवराज दाखले, उत्तम सकटे, मारुती सोनटक्के, सतीश भवाळ, संजय ससाणे, सुनील भिसे, भगवान शिंदे, विशाल कसबे, बाळासाहेब रसाळ, प्रसाद केसरे, बाळासाहेब खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
गीतगायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रबोधन पर्वाची सुरुवात
प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात निलेश देवकुळे यांनी प्रबोधनात्मक गीतगायन सादर केले. त्यानंतर बापू पवार यांनी ‘लेखणीचा बादशहा’ हा कार्यक्रम सादर केला. सायंकाळच्या सत्रात अनिकेत जवळेकर यांच्या प्रबोधनात्मक गीतगायनाने उपस्थितांचे लक्ष वेधले. तर शाहीर शैलेश लोखंडे यांनी ‘देशभक्तिपर गीते, अभिमान महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
महापुरुषांचे कार्य, त्यांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपाशेजारी १६ नोव्हेंबरपर्यंत हे विचार प्रबोधन पर्व सुरू राहणार आहे. नागरिकांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून या पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.






