अंटाल्या येथील COP31 परिषदेत प्रकल्पाचे सादरीकरण; महापालिकेच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मान्यता
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरणपूरक विकासाच्या प्रयत्नांना आता जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित सेतू’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषदेत (UNFCCC COP31) सादरीकरण करण्यात आले. तुर्कीयेतील अंटाल्या शहरात ९ ते २० नोव्हेंबरदरम्यान सुरू असलेल्या या परिषदेत १४ नोव्हेंबर रोजी प्रकल्पाची माहिती मांडण्यात आली. या उपक्रमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही जगासमोरील गंभीर आव्हाने बनली आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक विकास आणि शाश्वत शहरनिर्मितीवर जगभरातील देश भर देत आहेत. अशा जागतिक व्यासपीठावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे सादरीकरण होणे, ही शहराच्या पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
युरोपमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांमध्येही ‘हरित सेतू’ प्रकल्पाची चर्चा झाली. भारतात जागतिक स्तरावर आदर्श ठरतील असे नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे शहरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचविण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहभाग सातत्याने वाढत आहे. ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात शहराचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. केंद्र शासनाच्या ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’मध्ये देशातील १०० शहरांमधून पिंपरी-चिंचवडने पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळविले होते. तसेच स्मार्ट सिटी आणि केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यामध्ये बापूसाहेब गायकवाड, सुनील पवार, अमित दीक्षित, स्वप्नील शिर्के, अनंत चिटके आणि प्रसाद देशमुख आदी अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराने राष्ट्रीय स्तरापलीकडे जागतिक पातळीवरही आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
महापौर रवि लांडगे म्हणाले, शहराचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ आणि शाश्वत शहर निर्माण करणे हेदेखील महत्त्वाचे आहे. ‘हरित सेतू’ प्रकल्पाचे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत कौतुक होणे ही संपूर्ण पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहराच्या विकासात पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे. ‘हरित सेतू’ प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय परिषदेत दखल घेतली जाणे ही शहरासाठी अभिमानाची बाब असून, स्थानिक पातळीवरील उपक्रम जागतिक स्तरावर पोहोचत असल्याने भविष्यात अशा प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
सहशहर अभियंता बापू गायकवाड म्हणाले, शहराच्या विकासात पर्यावरणाचा समतोल राखणे आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करून उपक्रम राबविणे आवश्यक आहे. ‘हरित सेतू’ प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिकेने केलेल्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे महत्त्वपूर्ण असून, या उपक्रमाची उपयुक्तता आणि व्याप्ती वाढविण्यासाठी यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.






