मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती
काशिनाथ शिंदे
पिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता-भगिनींनी आपल्या श्रद्धा आणि भक्तीच्या माध्यमातून ही संस्कृती जपली आहे. भारतीय महिलांमध्ये रुजलेली संस्कारमूल्ये अतुलनीय आहेत. देवी सीता आणि सावित्री या आपल्या आदर्श आहेत. महिलांच्या सद्गुणांमुळेच कुटुंबात यशस्वी व्यक्तिमत्त्वे घडतात. छटपूजेच्या निमित्ताने इंद्रायणी नदीच्या तीरावर श्रद्धा आणि भक्तीचा एवढा मोठा जनसागर पाहून मन भारावून गेले, असे प्रतिपादन अयोध्येतील श्रीराम मंदिराचे विश्वस्त स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) मोशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर भव्य छटपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते भव्य गंगा आरती करण्यात आली. काशी येथून आलेल्या पुरोहितांनी मंत्रोच्चार आणि पारंपरिक विधींनी सादर केलेल्या गंगा आरतीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. सुमारे १५ हजार उत्तर भारतीय बांधव-भगिनी या महोत्सवात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्व श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे स्वागत केले. यावेळी स्वामी भरतानंद महाराज, आचार्य देशपांडे, नगरसेवक यश साने, कुंदन गायकवाड, निखिल बोराटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांनी इंद्रायणी नदीच्या घाटावर छठ मातेची विधिवत पूजा करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
या सामाजिक उपक्रमातून विश्व श्रीराम सेनेने सामाजिक बांधिलकीही जपली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीकरिता डॉ. लालबाबू गुप्ता यांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याकडे एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, संत ज्ञानेश्वर माऊली यांनी याच पवित्र इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या आळंदी येथे समाधी घेतली आहे. माऊली म्हणजे आई. आपण सर्व भारतमातेची लेकरे आहोत. देशभरातील माता-भगिनी आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी छठ मातेची श्रद्धेने पूजा करतात. अशा सर्व माता-भगिनींना मी वंदन करतो. भारतमातेची सेवा आणि देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकजुटीने कार्यरत राहिले पाहिजे. छठ माता सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, असे आशीर्वादही त्यांनी दिले.
छठ मातेच्या भक्तिगीतांसह महिलांनी सादर केलेल्या पारंपरिक छठ गीतांनी इंद्रायणी नदीचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दीपप्रज्वलन, पूजा, गंगा आरती आणि हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मोशीतील हा छटपूजा महोत्सव धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.






