पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाला केराची टोपली; ५१ हजारांचे विनापरवाना पिस्तूल जप्त
काशिनाथ शिंदे
दिघी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्रे बाळगण्यास मनाई असतानाही विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या २१ वर्षीय तरुणावर दिघी पोलिसांनी कारवाई केली आहे. कृष्णा सतीश घाडगे (वय २१, रा. नारायण नगर, खंडोबा माळ, फरसंगी, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) रात्री सुमारे ९.२५ वाजण्याच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकाकडून वाळके मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीकडे ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या आढळून आले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी ११ ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शस्त्रे बाळगण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून आरोपीने पिस्तूल जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल सुधीर हरिश्चंद्र डोळस यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक वरे पुढील तपास करीत आहेत.







