गुन्हे शाखा युनिट ३ची धडाकेबाज कामगिरी; चार दुचाकी व सात मोबाईल जप्त
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : भोसरी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या घटनेचा गुन्हे शाखा युनिट ३ने अवघ्या सहा तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज, बातमीदारांचे जाळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईच्या आधारे सहा आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत चार दुचाकी आणि सात मोबाईल असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. १८ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास परिमंडळ क्रमांक ३ची रात्रगस्त सुरू असताना आळंदी रोडवरील रूपाली बार अँड रेस्टॉरंटसमोर एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तातडीने उपचारासाठी ॲम्ब्युलन्सच्या मदतीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता १० ते १२ जणांनी हाताने तसेच काही वस्तूंच्या सहाय्याने जखमी व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट ३ने दोन स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. आरोपी चऱ्होली येथील प्रिझम सिटी परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेत पाठलाग करून सहा आरोपी व एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, बाळासाहेब खेडकर, अजित रुपनवर, निखिल फापाळे, नितीन गुंजाळ आणि दिलीप राठोड यांनी केली.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
महेश प्रकाश पाटील (३०), चक्रपाणी वसाहत, भोसरी
चेतन दिनकर सोमवंशी (२३), चऱ्होली
विकास अशोक मयनाळे (२५), धावडे वस्ती, भोसरी
संकेत श्याम सरवदे (२१), चक्रपाणी वसाहत, भोसरी
प्रथमेश राजू पाटील (२१), चक्रपाणी वसाहत, भोसरी
पवन रोहिदास पवार (२२), गव्हाणे पेट्रोल पंपासमोर, आळंदी रोड, भोसरी
एक विधीसंघर्षित बालक, संकेत विजय कामटे (१७), चक्रपाणी वसाहत, भोसरी
जप्त मुद्देमाल : सुमारे २ लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी मोटारसायकली आणि १ लाख रुपये किमतीचे सात मोबाईल फोन असा एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाणे गु.र. नं. ३३७/२०२६, बीएनएस कलम १०९(१), ११५(२), ३५२, १८९(२) अन्वये गुन्हा दाखल असून, आरोपी व विधीसंघर्षित बालकाची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना भोसरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.







