- गुन्हे शाखा युनिट-३चा मध्यरात्री छापा; १.२४ लाखांची देशी-विदेशी दारू जप्त, दोघे ताब्यात
काशिनाथ शिंदे :पुणे
सिंहगड रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत १ लाख २४ हजार ६३५ रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त केला. गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने हिंगणे खुर्द येथील साईनगर परिसरात ही कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे युनिट-३च्या पथकाने रात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. संशयित हालचालींची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अंकितकुमार सुरजन बिंद (वय २०) आणि आदित्य राजू शिंदे यांना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी देशी व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १,२४,६३५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्विनी सातपुते आणि पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली.
जप्त दारूसाठा आणि ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा दणका!
पुणे शहरात अवैध दारू विक्रीसह विविध बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू असून, सिंहगड रोडवरील या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी थेट कारवाई करत “कायद्याचा धाक कायम” असल्याचा संदेश दिला आहे.







