मुटकेवाडी परिसरात सापळा रचून सौरभ लोखंडेला घेतले ताब्यात; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
काशिनाथ शिंदे
चाकण : चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा बाळगणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. सौरभ बिरू लोखंडे (वय २३, रा. खंडोबा माळ, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट-३चे पथक चाकण परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस हवालदार युवराज बिराजदार आणि श्रीधन इचके यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक व्यक्ती गांजा घेऊन मुटकेवाडी, चाकण परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी सापळा रचला.
मुटकेवाडी परिसरात संशयित व्यक्ती येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गांजा आढळून आला. त्यानंतर आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार युवराज बिराजदार, संदीप सोनवणे, श्रीधन इचके आणि पोलिस शिपाई निखिल फापाळे यांच्या पथकाने केली.
घटना २६ ऑगस्ट २०२६ रोजी मुटकेवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे घडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







