चार दिवसांत ६५०० मेट्रिक टन कचरा संकलित; २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्याचे स्वतंत्र संकलन
काशिनाथ शिंदे
पिंपरी: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील विसर्जन घाट आणि मिरवणूक मार्गांवर स्वच्छतेची विशेष यंत्रणा कार्यान्वित केली होती. २२ ते २५ सप्टेंबर या चार दिवसांत तब्बल ६५०० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत तीन हजारांहून अधिक सफाई सेवक प्रत्यक्ष मैदानात कार्यरत होते.
विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गांवर निर्माण होणारा कचरा तातडीने हटविण्यासाठी आरोग्य विभागाच्या विशेष स्वच्छता पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असतानाही स्वच्छता सेवकांनी सातत्याने काम करून घाट परिसर आणि मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवले.
२९४ मेट्रिक टनांहून अधिक निर्माल्य संकलित
गणेशमूर्तींना वाहण्यात आलेली फुले, हार आणि पूजासाहित्यापासून निर्माण होणारे २९४.६५५ मेट्रिक टन निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. निर्माल्य नियमित कचऱ्यात मिसळू नये, यासाठी विसर्जन घाटांवर स्वतंत्र निर्माल्य संकलन व विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.
विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही स्वच्छता पथकांनी तत्परतेने काम सुरू ठेवले. घाट परिसर, मिरवणूक मार्ग आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आल्याने विसर्जनानंतरची स्वच्छता व्यवस्थाही सुरळीतपणे राबविण्यात आली.
नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “गणेश विसर्जनाच्या कालावधीत नागरिकांनी स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेला दिलेले सहकार्य अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले. अनेक नागरिकांनी निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून कचरा योग्य ठिकाणी देण्यास प्राधान्य दिल्यामुळे घाट परिसर आणि मिरवणूक मार्गांवरील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत झाली. स्वच्छतेबाबत नागरिकांनी दाखविलेली जागरूकता आणि सहकार्य कौतुकास्पद आहे.”
“मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला कचरा तातडीने संकलित करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या सर्व सफाई सेवक आणि आरोग्य विभागाच्या पथकांचे कामही कौतुकास पात्र आहे. नागरिक आणि महापालिका यंत्रणेच्या समन्वयातून स्वच्छतेची ही व्यवस्था प्रभावीपणे राबविता आली,” असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, गणेशोत्सव आणि विसर्जन काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची पथके सातत्याने कार्यरत होती. घाट परिसरात नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वच्छता पथके प्रत्यक्ष ठिकाणी तैनात करण्यात आली होती.
शहराची स्वच्छता कायम राखण्यासाठी नागरिकांनी कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्याचे योग्य विलगीकरण करून महापालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.






