अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त चिखली टाऊन हॉल येथे बालनाट्य व अभंग-भक्तीगीतांचा सुरेल कार्यक्रम
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त चिखली टाऊन हॉल येथे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर ‘सा रे ग म प’ फेम गायक ज्ञानेश्वर मेश्राम, गायिका कल्याणी देशपांडे आणि सहकाऱ्यांनी ‘अभंगवारी’ या अभंग व भक्तीगीतांच्या कार्यक्रमातून रसिकांना भक्तिरसाची अनुभूती दिली.
लहान मुलांसाठी विशेष मनोरंजनात्मक स्वरूपात सादर करण्यात आलेल्या ‘ग्रीझीच्या दुनियेत चिंटूची धमाल’ या बालनाट्याला महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रीझी अस्वल आणि चिंटू या प्रमुख व्यक्तिरेखांभोवती रंगणारे विनोदी प्रसंग, मजेदार गाणी, नृत्य आणि धमाल जुगलबंदी यामुळे चिखली टाऊन हॉलमध्ये हास्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
बालनाट्यातील विनोद, गंमत आणि मनोरंजनासोबतच गाणी व नृत्याची प्रभावी सांगड घालण्यात आली होती. रंगमंचावरील कलाकारांच्या सादरीकरणाला विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त दादेमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. अनेक प्रसंगांमध्ये विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत कलाकारांना प्रतिसाद दिला.
या बालनाट्याचे भव्य आणि रंगीत नेपथ्य हेही विशेष आकर्षण ठरले. बालमनाला आकर्षित करणारी रंगसंगती, दृश्यरचना, प्रकाशयोजना आणि रंगमंचावरील विविध प्रसंगांमुळे नाटकातील कल्पनाविश्व विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उभे राहिले. ग्रीझी आणि चिंटूच्या धमाल प्रसंगांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, तर मराठी रंगभूमीशी त्यांचा सहज आणि आनंददायी परिचयही झाला.
‘अभंगवारी’तून भक्तिरसाची अनुभूती
बालनाट्यानंतर चिखली टाऊन हॉल येथे ‘सा रे ग म प’ फेम गायक ज्ञानेश्वर मेश्राम, गायिका कल्याणी देशपांडे आणि सहकाऱ्यांचा ‘अभंगवारी’ हा अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला. अभंग आणि भक्तीगीतांच्या सुरेल सादरीकरणातून संतपरंपरेतील भक्ती, अध्यात्म आणि संगीताचा संगम रसिकांसमोर उलगडला.
संतांच्या अभंगांमधून व्यक्त होणारी भक्तिभावना, अध्यात्मिक विचार आणि भावस्पर्शी संगीतामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून बालमनाचे मनोरंजन करण्याबरोबरच मराठी रंगभूमी, संतसाहित्य, अभंग आणि भक्तिसंगीताच्या समृद्ध परंपरेशी विद्यार्थ्यांसह रसिकांना जोडण्याचा प्रयत्न झाला







