बोनस, ग्रॅज्युटी, विमा, समान काम समान वेतनासह विविध मागण्या; अपर कामगार आयुक्तांसोबत लवकरच बैठक
काशिनाथ शिंदे
पिंपरी : कंत्राटी, कायमस्वरूपी तसेच हंगामी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासन व प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती कामगार नेते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संत तुकारामनगर, पिंपरी येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभामंडपात रविवारी (दि. ४) भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यशवंतभाऊ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात कंत्राटी तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सन २०२५-२६ चा बोनस कायद्यानुसार दिवाळीपूर्वी देण्यात यावा. तसेच सेवानिवृत्त झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व बोनसचा लाभ देण्यात यावा. सफाई कर्मचारी आणि परिचारिकांना पाच लाख रुपयांपर्यंतची विमा पॉलिसी देण्यात यावी. या विमा योजनेत त्यांच्या कुटुंबीयांनाही लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी निश्चित केलेल्या किमान वेतन दराप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन न देणाऱ्या तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनातून शोषण करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी. संबंधित कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार पूर्ण वेतन मिळेल, याची प्रशासनाने खात्री करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरांचा लाभ द्या
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना ४५० चौरस फुटांचे घर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यशवंतभाऊ भोसले यांनी केली. औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) नियमांनुसार कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्य व सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत. कर्मचाऱ्यांची वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचारांची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
‘समान काम, समान वेतन’ची मागणी
महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार ‘समान काम, समान वेतन’ लागू करण्यात यावे. महानगरपालिकेतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना ज्या स्वरूपाचे वेतन मिळते, त्याचप्रमाणे संबंधित काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायद्यानुसार वेतन मिळावे, अशी ठाम भूमिका यशवंतभाऊ भोसले यांनी मांडली.
या मागण्यांच्या पूर्ततेसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाच्या संबंधित विभागांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने लेखी निवेदन देण्यात येणार आहे.
दरम्यान, या विविध मागण्यांबाबत अपर कामगार आयुक्त, पुणे, अभय गीते यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्याचे यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेची पुढील दिशा काय असेल, याबाबतही मेळाव्यात उपस्थित कंत्राटी, कायमस्वरूपी आणि हंगामी कर्मचाऱ्यांना यशवंतभाऊ भोसले यांनी मार्गदर्शन केले.







