काशिनाथ शिंदे
पिंपरी : संत तुकारामनगर परिसरातील संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यान फुटपाथवर एका ५० वर्षीय व्यक्तीवर सिमेंटच्या चौकोनी फरशीने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता घडली. याप्रकरणी गणेश प्रभाकर सरकटे (वय २४, रा. आंबेडकरनगर पुनर्वसन वसाहत, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील प्रभाकर कुंडलीक सरकटे (वय ५०) यांच्यावर अज्ञात कारणातून आरोपींनी सिमेंटच्या चौकोनी फरशीने डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रोहित ऊर्फ भाई जांगे प्रकाश धोत्रे, अर्णव ऊर्फ अरव लोकेंश ऊर्फ आरब्या (रा. दिघी, पुणे), प्रणित प्रशांत निकाळजे (वय १९, रा. संतोषी माता चौक, नेहरूनगर, पिंपरी) आणि सचिन राम साबळे (वय २९) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी रोहित जांगे, प्रणित निकाळजे आणि सचिन साबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







