खंडोबा चौकात निषेध सभा; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी
काशिनाथ शिंदे
मावळ/टाकवे बुद्रुक : अवघ्या २ वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना टाकवे बुद्रुक येथे समोर आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानवीय घटनेचा तीव्र निषेध नोंदवत ग्रामस्थांनी टाकवे बुद्रुक बाजारपेठ दिवसभर बंद ठेवली. तसेच खंडोबा चौकात मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र येत निषेध सभा घेत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी बाळू नामदेव आसवले (वय ५१, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चिमुकलीवरील अत्याचाराची माहिती समोर आल्यानंतर टाकवे बुद्रुक परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. निष्पाप बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. घटनेचा निषेध करण्यासाठी व्यापारी व ग्रामस्थांनी बाजारपेठ बंद ठेवत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
खंडोबा चौकातील निषेध सभेत ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला कोणतीही दयामाया दाखवू नये, तसेच कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत असून, घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.







