‘दीक्षारंभ २०२६’मध्ये वास्तुकलेच्या अभ्यासाची अनुभवाधारित ओळख
काशिनाथ शिंदे
पिंपरी : देहू आणि आळंदी परिसरातील ऐतिहासिक वास्तू या स्थानिक सांस्कृतिक परंपरा, परिसराचा संदर्भ आणि वास्तुकला यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शक ठरतात. या वास्तू केवळ भौतिक रचना नसून त्यामागे इतिहास, संस्कृती, परंपरा, स्थानिक जीवनशैली आणि परिसराशी असलेले नाते दडलेले असते. त्यामुळे वास्तुकला ही समाज, संस्कृती, पर्यावरण आणि मानवी जीवनाशी जोडलेली सर्जनशील प्रक्रिया आहे. ती समजून घेत विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी, असे प्रतिपादन एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये प्रथम वर्ष बी.आर्क.च्या विद्यार्थ्यांचे ‘दीक्षारंभ २०२६’ या कार्यक्रमातून उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वास्तुकलेच्या अभ्यासाची दिशा, प्रत्यक्ष अनुभवाचे महत्त्व आणि सर्जनशील दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वास्तुविशारद प्रज्ञा आवटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वास्तुकलेचा अभ्यास केवळ वर्गातील सैद्धांतिक ज्ञानापुरता मर्यादित नसून प्रत्यक्ष निरीक्षण, अनुभव, प्रयोग, सर्जनशील विचार आणि समूहकार्याच्या माध्यमातून तो अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येतो, असे त्यांनी सांगितले. तसेच टाकाऊ वस्तूंपासून नमुने तयार करणे आणि छायाचित्रणाचा वास्तुकलेच्या अभ्यासासाठी प्रभावीपणे वापर कसा करता येतो, याची माहितीही त्यांनी दिली.
या प्रथम वर्ष स्वागत समारंभातील विद्यार्थ्यांना पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.







