कडजाई मंदिर इंदोरी, तुळजाभवानी मंदिर तळेगाव दाभाडे चोरीप्रकरणी पोलिसांची कारवाई
काशिनाथ शिंदे
नवलाख उंब्रे : कडजाई मंदिर, इंदोरी तसेच तुळजाभवानी मंदिर, तळेगाव दाभाडे येथे चोरी केल्याप्रकरणी गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने थेरगाव परिसरातून जेरबंद केले. राहुल शिवाजी राठोड (वय २४, रा. नखाते नगर, थेरगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १६९/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५, ३(५) अन्वये दाखल गुन्ह्यात राहुल राठोड हा पाहिजे व फरार आरोपी होता. तपास पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे थेरगाव परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या तपासात सदर आरोपीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुकुट चोरी, तसेच दक्षिण माळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिर चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, परिमंडळ-४च्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि महाळुंगे विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, सहाय्यक पोलीस फौजदार अनंत रावण, पोलीस शिपाई भिमराव खिलारे आणि पोलीस शिपाई विनायक शेरमाळे यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.







