गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई; ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
काशिनाथ शिंदे
पिंपरी: भरदिवसा पाळत ठेवून गाडीच्या डिक्कीतील रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी २० हजार २०० रुपये तसेच दोन मोबाईल असा एकूण ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये दाखल गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाकडून समांतर तपास सुरू होता. फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत दोन संशयित व्यक्ती पीसीएस चौक ते दाभाडे सरकार चौक रस्त्यावरील प्लुमेरिया हॉलजवळ थांबलेल्या असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तातडीने सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपल्या साथीदार भैय्या सोनावणे याच्यासोबत भोसरी एमआयडीसी परिसरात सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आशुतोष नितीन भाटी (वय १९, रा. हरिपाठ उद्यान, चार नंबर शाळेजवळ, अशोक पवार यांच्याकडे भाड्याने, आळंदी) आणि अमित अरविंद बनसोडे (वय १८, रा. गुलाब गोडसे यांच्या रूममध्ये, आळंदी) अशी आहेत. या गुन्ह्यातील भैय्यासोनवणे हा निष्पन्न आरोपी आहे.
४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीच्या रकमेपैकी २० हजार २०० रुपये, तसेच विवो कंपनीचा मोबाईल (१० हजार रुपये) आणि रेडमी कंपनीचा मोबाईल (१० हजार रुपये) असा एकूण ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपींचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहास निरंक असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, बाळासाहेब खेडकर, अजित रुपनवर, स्वप्निल महाले, सुंदर थोरात, बाळासाहेब भांगले, निखिल फापाळे, दिलीप राठोड आणि नितीन गुंजाळ यांच्या पथकाने केली.
संतोष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी-चिंचवड यांच्यामार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली.






