काशिनाथ शिंदे
रावेत : शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे व्यक्ती नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे, संस्कारांची पायाभरणी करणारे आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती करणारे राष्ट्रनिर्माते आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त काही शिक्षकांचा प्रत्यक्ष भेटून सन्मान करणे राहून गेले होते. त्यामुळे हॉटेल तक्ष, रावेत येथे झालेल्या रोटरी क्लबच्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान संबंधित शिक्षकांना समक्ष आमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रोटेरियन अमित औटी यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारक्षम कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याबरोबरच जबाबदार नागरिक घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सचिव रोटेरियन शुशांक भूमकर यांनी नमूद केले. “शिक्षक घडवतो विद्यार्थी, विद्यार्थी घडवतो समाज आणि समाज घडवतो राष्ट्र,” या भावनेतून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रोटेरियन अमित औटी, सचिव रोटेरियन शुशांक भूमकर, संचालक रोटेरियन गणेश बोरा, प्रशासकीय संचालक रोटेरियन सुभाष वाल्हेकर, ज्येष्ठ सदस्य रोटेरियन आबा जाधव तसेच माजी सचिव वसंतराव ढवळे उपस्थित होते.
सत्कारमूर्ती रामेश्वर पवार यांचा संचालक रोटेरियन गणेश बोरा आणि अध्यक्ष अमित औटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. योगगुरू अभिषेक वाल्हेकर यांचा ज्येष्ठ रोटरी सदस्य आबा जाधव आणि अध्यक्ष अमित औटी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच गोविंद चितोडकर यांचा माजी सचिव वसंतराव ढवळे आणि सचिव शुशांक भूमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिक्षकांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, त्यांच्या कार्याप्रती असलेला आदर, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचे ते प्रतीक आहे, असे संचालक रोटेरियन गणेश बोरा यांनी नमूद केले.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याची तसेच सामाजिक जाणीव अधिक दृढ करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असा विश्वास अध्यक्ष अमित औटी यांनी व्यक्त केला.
“ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करून अनेक पिढ्यांचे भविष्य उजळविणाऱ्या सर्व शिक्षकांना मनःपूर्वक अभिवादन!”






