काशिनाथ शिंदे: हिंजवडी
हिंजवडी, पैशांच्या वादातून आणि वैयक्तिक रागातून एका तरुणाचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गणेश मोगरे यांनी आरोपी प्रणव वाळेकर याला दिलेले पैसे परत मागितले होते. तसेच आपल्या मुलीशी संपर्क ठेवू नये, अशी समजही त्यांनी प्रणवला दिली होती. या कारणाचा राग मनात धरून प्रणव वाळेकर याने साथीदार अनिकेत शिंदे आणि अथर्व चिहे यांच्या मदतीने गणेश याला गाठले. तिघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर प्रणव वाळेकर याने गणेशचा गळा दाबून त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
ही घटना १५ ते १७ जुलै २०२६ दरम्यान मुळशी तालुक्यातील माण गावातील राक्षे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी मृत गणेशचे वडील रंगनाथ अंकुश मोगरे (वय ४३) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४७६/२०२६ नोंदवत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात प्रणव वाळेकर आणि अनिकेत शिंदे यांना अटक करण्यात आली असून अथर्व चिहे याचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.







