पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान
काशिनाथ शिंदे
पिंपरी: “ज्या मराठी भाषेत ‘ज्ञानेश्वरी’सारखा महान ग्रंथ लिहिला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले, त्या भाषेला अभिजाततेचा वेगळा दर्जा देण्याची गरजच नाही. ती भाषा मुळातच अभिजात आहे. या अभिजात मराठीतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला,” असे प्रतिपादन पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ व ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या उद्घाटनप्रसंगी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
याप्रसंगी हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी भारती मंगेशकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रतिनिधी तुषार झरेकर, किशोर बरकुले तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “ज्या भाषेमध्ये ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली गेली आणि ज्या मराठीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजे होऊन गेले, त्या भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याची गरज नाही. ती मुळातच अभिजात आहे. या अभिजात मराठीतील अभिजात काव्याला स्वरबद्ध करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. मला जेव्हा जेव्हा अभिजात काव्य सापडत गेले, तेव्हा ते स्वरबद्ध करत गेलो. कविता मला अंतर्मुख करते.”
“माझ्या बालपणी आई मला गावाकडच्या अनेक गोष्टी सांगायची. त्यानंतर तिने मला पुस्तके वाचून दाखवायला सुरुवात केली. माझ्या हातात आलेले पहिले पुस्तक एक नाटक होते आणि त्याचे लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्या काळात कानावर पडणाऱ्या भाषेच्या सौंदर्याने मनावर खोल संस्कार केले. शब्द, भाषा आणि स्वर यांचे नाते तेव्हापासूनच मनात रुजत गेले,” असेही त्यांनी सांगितले.
“स्वरांची माऊली आहे, शब्दांची माऊली आहे आणि भाषेचीही एक माऊली आहे. ज्ञानेश्वरांना लोक ‘माऊली’ म्हणू लागले, कारण ते ज्या भाषेला टेकून बसले होते, त्या भाषेनेच असंख्य लोकांना ज्ञान आणि भावविश्व दिले. त्या भाषेचे वैभव अनुभवताना तिच्याप्रती असलेली कृतज्ञता अधिक दृढ होते,” असे हृदयनाथ मंगेशकर यांनी नमूद केले.
आपल्या संगीतप्रवासाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “माझी मोठी बहीण स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अभिजात संगीत निर्माण केले. त्यांच्या आशीर्वादाचा आणि संस्कारांचा माझ्या संगीतसाधनेत मोठा वाटा आहे. माझी मोठी बहीण शारदा विश्वमोहिनी होती. मंगेशकर कुटुंबातून मिळालेला हा सांगीतिक वारसा माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या निमित्ताने केलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. या सन्मानाबद्दल मी महानगरपालिकेचा मनःपूर्वक आभारी आहे.”
‘आपण स्वतः एक अथांग समुद्र आहात’
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, “पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महान कलाकाराचा सन्मान करण्याचे भाग्य पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला लाभले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याची उंची अधिक वाढली आहे. त्यांच्या कर्तृत्वाची आणि संगीतसाधनेची व्याप्ती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला, तरी आमच्या शब्दांना एक किनारा आहे; मात्र त्यांच्या शब्दांना आणि संगीताला कोणताही किनारा नाही. ते स्वतः एक अथांग समुद्र आहेत.”
“त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आभा अतिशय निर्मळ आणि प्रसन्न आहे. त्यांचे मार्गदर्शन, सहवास आणि कलेचा समृद्ध वारसा आम्हाला तसेच पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहो. त्यांनी यापुढील आयुष्य आरोग्यसंपन्न, आनंदी आणि दीर्घायुषी जगावे आणि त्यांच्या हातून आणखी उत्तमोत्तम कलानिर्मिती घडावी,” अशी सदिच्छाही बगाडे यांनी व्यक्त केली.
‘अभिजातत्व दैनंदिन जीवनात दिसले पाहिजे’
विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी प्रास्ताविकात सांगितले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र या अभिजातत्वाचा गौरव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनात, व्यवहारात आणि पुढील पिढ्यांच्या संस्कारांमध्ये दिसला पाहिजे.”
“याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही यानिमित्ताने विविध सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांचे आयोजन केले आहे,” असे त्यांनी सांगितले.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्याचा गौरव करताना गायकवाड म्हणाले, “संगीतसूर्य मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या समृद्ध संगीतपरंपरेचा वारसा लाभलेल्या मंगेशकर कुटुंबाने भारतीय संगीतविश्वाला अनेक अनमोल स्वर दिले. त्याच महान परंपरेतील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, प्रयोगशील संगीतदृष्टीने आणि सखोल संगीतसाधनेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक, लोकसंगीताची मातीशी जोडलेली सहजता, पाश्चात्त्य संगीताची प्रयोगशीलता आणि मराठी शब्दांविषयीची विलक्षण संवेदनशीलता दिसून येते.”
छायाचित्र प्रदर्शनातून पत्रकारितेचे विविध पैलू उलगडणार
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, “माध्यम प्रतिनिधींनी टिपलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होत आहे, ही आमच्यासाठी भाग्याची आणि आनंदाची बाब आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून वृत्त छायाचित्रकार पत्रकारितेत महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेकदा एखाद्या वृत्त छायाचित्रकाराने टिपलेले एक छायाचित्र संपूर्ण बातमी सांगून जाते.”
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या कलादालनात ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. माध्यम प्रतिनिधींनी कॅमेऱ्यात टिपलेल्या विविध घटना आणि प्रसंगांच्या माध्यमातून समाजातील अनेक पैलू या प्रदर्शनातून नागरिकांना अनुभवता येणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन राजेंद्र पाटील यांनी केले.
यावेळी उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मानले. मानपत्राचे वाचन किरण गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.






