‘अस्त्र’ रॉकेटने गाठली ९७३ मीटर उंची; रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण आणि पुनर्प्राप्ती करणारी स्पर्धेतील एकमेव टीम
काशिनाथ शिंदे
पिंपरी: भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) ‘टीम अनंतम – रॉकेटरी अँड स्पेस रिसर्च’ या विद्यार्थी संघाने ‘एस्ट्रोवर्स अक्षयान २०२६’ स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावला. उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या या स्पर्धेत संघाने ‘अस्त्र’ या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. या रॉकेटने तब्बल ९७३ मीटर उंची गाठली. विशेष म्हणजे, रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून त्याची पुनर्प्राप्ती करण्यातही टीम अनंतमने यश मिळवले. ही कामगिरी करणारा हा स्पर्धेतील एकमेव संघ ठरला.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पीसीसीओई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे भारतीय अवकाश आणि विमान अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रात महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. घन इंधन रॉकेट मोटर प्रक्षेपण या प्रकारात संघाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.
एस्ट्रोवर्स संस्थेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील २० नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विविध संघांशी स्पर्धा करत टीम अनंतमने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. विजेत्या संघाला एस्ट्रोवर्सचे सहसंस्थापक शुभम कुमार आणि अजय रावत यांच्या हस्ते ३० हजार रुपयांचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणार – ज्ञानेश्वर लांडगे
टीम अनंतमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, “टीम अनंतमने भारतीय अवकाश आणि विमान अभियांत्रिकी क्षेत्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. रॉकेट निर्मिती आणि अवकाश संशोधन क्षेत्रातील नवनवीन आव्हाने स्वीकारत विद्यार्थ्यांनी यापुढेही अधिक उंची गाठावी. भविष्यात अवकाश तंत्रज्ञान आणि विमान अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील.”
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली संशोधन
‘टीम अनंतम – रॉकेटरी अँड स्पेस रिसर्च’ ही पीसीसीओईच्या मोटर स्पोर्ट्स कौन्सिलअंतर्गत कार्यरत असलेली विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील रॉकेट निर्मिती आणि अवकाश संशोधन संस्था आहे. या संघाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष रॉकेट निर्मिती, प्रक्षेपण आणि अवकाश संशोधनाशी संबंधित विविध तांत्रिक बाबींवर काम करतात.
या संघाचे समन्वयक प्रा. डॉ. जयेश चोरडिया असून, संघप्रमुख विवेकानंद झांबरे यांच्या नेतृत्वाखाली दिव्या पाटील, ओंकार पाटील, कुशल सरोदे, मानसी कटारिया, अनुष्का कालंत्रे, सोहम सपकाळ, साक्षवत भुसारे, प्रथम बोकेफोडे आणि माधव जोशी यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी आणि उपसंचालक निळकंठ चोपडे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
संशोधन व विकास अधिष्ठाता नरेंद्र देवरे, अधिष्ठाता डॉ. पद्माकर देशमुख, सहयोगी अधिष्ठाता अमित पंचवाडकर, प्रा. डॉ. जयेश चोरडिया आणि डॉ. अश्विनी शिंदे यांनी संघाला मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयातील संशोधन आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकासाच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे.







