किल्ला चढताना ३५ वर्षीय जिज्ञेश खंडाळकर यांची प्रकृती बिघडली; महावितरण कर्मचारी, पुरातत्त्व विभाग आणि स्थानिक नागरिकांचे बचावकार्य
काशिनाथ शिंदे
पुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ला चढत असताना जिज्ञेश खंडाळकर (वय ३५) या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
किल्ला चढत असताना जिज्ञेश खंडाळकर यांची अचानक प्रकृती बिघडली. घटनेची माहिती मिळताच पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. सर्वांनी एकत्रितपणे बचावकार्य करत त्यांना किल्ल्यावरून खाली आणले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पाळीव कुत्र्याची निष्ठा चर्चेचा विषय
या दुर्दैवी घटनेदरम्यान जिज्ञेश यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या जवळच थांबून होता. संकटाच्या या प्रसंगी आपल्या मालकाला सोडून न जाणाऱ्या या मुक्या जीवाचे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून, कुत्र्याच्या निष्ठेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत महावितरण कर्मचारी, पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता माणुसकीचे दर्शन घडवणारी ठरली. मात्र, एका पर्यटकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने राजगडावर शोककळा पसरली आहे.







