जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने १६ ऑक्टोबरला आयोजन; उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती आणि करिअरविषयक मार्गदर्शन
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे जपानच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने ‘नो जपान २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध कक्ष आणि जपान सुविधा केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी आणि विविध उद्योगांतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जपानमधील उच्च शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्ती, प्रशिक्षणार्थी संधी, नोकरीच्या संधी, करिअरचे विविध मार्ग, तंत्रज्ञानातील प्रगती, उद्योगांच्या अपेक्षा आणि जपानी कार्यसंस्कृती यांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यासोबतच जपानमधील शैक्षणिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक संधींची ओळखही करून दिली जाणार आहे.
पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे, जागतिक शिक्षण व संशोधन क्षेत्राशी जोडणे आणि करिअरच्या नव्या वाटा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. भारतातील विद्यार्थी, जपानमधील शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यात परस्पर सामंजस्य व सहकार्य वाढवण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना व्यापक जागतिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि व्यावसायिक क्षेत्रातील संधी समजून घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते,” अशी माहिती पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे व अजिंक्य काळभोर तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संधींचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि भारत-जपान यांच्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संबंध अधिक दृढ करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे







