वीज वितरण रोहित्र चोरीच्या गुन्ह्यांसह तीन संशयितांना अटक; ५ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ने वीज वितरण रोहित्रातील (डीपी) तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींसह तीन संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ग्रामीण भागात दिघी, आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वीज वितरण रोहित्र चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा युनिट-३ला आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळे आणि आसपासच्या परिसरात माहिती घेत असताना पोलीस अंमलदार दिलीप राठोड व बाळासाहेब खेडकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार वीज वितरण रोहित्रातील मौल्यवान धातू चोरणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यात आला.
तिघांना ताब्यात घेताच गुन्ह्यांची उकल
पोलिसांनी पिंपळगाव परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी वीज वितरण रोहित्रातील तांब्याच्या तारा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१. सामिगत गुरुदित्य गोस्वामी (वय ४५), रा. मखदूम ता. मढियाहू, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश.
२. विनोद हरिराम जैस्वार, वय ४० वर्षे, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश.
३. मनिष महेंद्र प्रसाद (वय ३८), रा. मढियाहू, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश.
४. चार नंबर आरोपी फरार आहे
आरोपींकडून आळंदी, मरकळ आणि पिंपळगाव परिसरातील वीज वितरण रोहित्रांमधील तांब्याच्या तारा चोरी केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात चोरी केलेल्या धातूच्या तारांसह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहा गुन्हे उघडकीस
या कारवाईत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीज वितरण रोहित्र चोरीचे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि भारतीय विद्युत कायद्यानुसार विविध गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने गोपनीय माहिती, घटनास्थळावरील तपास आणि संशयितांचा माग काढत ही कामगिरी केली. वीज वितरण यंत्रणेतील महत्त्वाचे रोहित्र लक्ष्य करून होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावारकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. दर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट-३चे संतोष कसबे सुनील जावळे, भरत गोसावी, पोलीस अंमलदार युवराज बिराजदार, सोमनाथ बोहाडे, बाळासाहेब खेडकर, दिलीप राठोड, स्वप्निल महाले आणि अजित राणावर यांनी ही कारवाई केली.
चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन वीज वितरण रोहित्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट-३ला यश आले आहे.







