कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचे आवाहन; राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा जाहीर पाठिंबा
पिंपरी, प्रतिनिधी | काशिनाथ शिंदे
पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदान करून विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने राज्यभरातील भाजपच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक कन्येला प्रतिनिधित्वाची संधी द्या!
डॉ. स्मिता योगेश जाधव या डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा शिक्षणमहर्षी पी. डी. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे बालपण आणि शिक्षण पिंपरी-चिंचवड परिसरात झाले असून, गेल्या १७ वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेने पिंपरी-चिंचवडसह देशाच्या शैक्षणिक व औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देश-विदेशांत विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, असे भोसले यांनी सांगितले.
डॉ. स्मिता जाधव या आपल्या शहरातील कन्या असून, त्यांना पदवीधर मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. पुणे पदवीधर मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांतील मतदारांनी भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षण क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पाठिंबा
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी एम.कॉम. आणि एमबीएपर्यंत शिक्षण घेतले असून, ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे नातू आहेत. शिक्षण क्षेत्राशी संबंधित पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही उमेदवारांना भाजपने संधी दिली आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी त्यांना पाठिंबा देऊन विजयी करावे, असे भोसले यांनी नमूद केले.
निवडणूक प्रक्रियेत पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपल्या पसंतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला नंदू आप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, मंगेश धाडगे, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा जाहीर पाठिंबा
राज्यभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी देण्यात आलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याची माहिती कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.







