कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांची ठाम भूमिका; आंदोलनाच्या नावाखाली अवमानकारक वक्तव्यांना विरोध
पिंपरी : काशिनाथ शिंदे
आंदोलन करणे, सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करणे आणि लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, आंदोलन करताना देशाची प्रतिष्ठा आणि घटनात्मक पदांचा सन्मान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. देशाचा आणि देशाच्या पंतप्रधानांचा अपमान देश सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केली. संत तुकाराम नगर, पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला नंदू आप्पा कदम, महेंद्र बाविस्कर, मंगेश धाडगे आणि दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
आंदोलनाचा अधिकार मान्य; मात्र देशाच्या प्रतिष्ठेचे भान ठेवा!
यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून आपण मुंबईसह विविध ठिकाणी सामाजिक आणि कामगार चळवळीत सक्रिय असून अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो आहोत. सरकारच्या धोरणांवर टीका करणे, प्रश्न उपस्थित करणे आणि चर्चेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणे हा लोकशाहीचा भाग आहे. मात्र, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदांवरील व्यक्तींवर वैयक्तिक पातळीवर अर्वाच्य भाषेत टीका करणे योग्य नाही. आंदोलन करताना मतभेद व्यक्त करण्याची पद्धतही लोकशाही मूल्यांना धरून असली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
परदेशात जाऊन देशाची बदनामी करणे अयोग्य!
युट्यूबर ध्रुव राठी यांनी आंदोलनात सहभागी होत भारताचे पंतप्रधान आणि देशाबाबत केलेल्या कथित टीकेवर भोसले यांनी आक्षेप नोंदवला. देशांतर्गत मतभेद परदेशात मांडताना देशाच्या प्रतिष्ठेचे भान राखले पाहिजे, असे ते म्हणाले.
भारताला ब्रिटिशांच्या दीर्घकालीन पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चाफेकर बंधू यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे योगदान दिले. अनेकांनी देशासाठी बलिदान दिले. अशा देशात जन्मलेल्या नागरिकांनी परदेशात जाऊन देशाच्या आणि पंतप्रधानांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे मत भोसले यांनी व्यक्त केले. देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या अशा कृती देशप्रेमी नागरिकांना मान्य होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
जागतिक स्तरावरील भारताच्या प्रतिष्ठेचा विचार करा!
कोरोना महामारीच्या काळात आणि आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले, असा दावा भोसले यांनी केला. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा विचार केला पाहिजे. देशाला मिळालेल्या सन्मानाला धक्का पोहोचेल, अशा कृती टाळल्या पाहिजेत. जंतरमंतरवरील घडामोडींमुळे देशाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मतदार यादी पुनरीक्षणाबाबतही मांडली भूमिका
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीचा आणि मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा उल्लेख करत भोसले यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेबाबत आपली भूमिका मांडली.
विरोधी पक्षांनी यापूर्वीच्या निवडणुकांवर आक्षेप घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो, असे ते म्हणाले. देशातील पात्र नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळावा, तसेच सरकारी योजनांचे लाभ आणि रोजगाराच्या संधी पात्र नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी मतदार यादीची अचूकता महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांसारख्या देशांमधून आलेल्या विदेशी नागरिकांच्या नागरिकत्वासह त्यांना मिळणाऱ्या लाभांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया राबवताना कोणत्याही पात्र भारतीय नागरिकावर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देशाची प्रतिष्ठा, लोकशाही मूल्ये आणि घटनात्मक पदांचा सन्मान जपणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असा संदेश यशवंतभाऊ भोसले यांनी या पत्रकार परिषदेतून दिला.







