कस्तुरी चौकातील लेबर कॅम्पमध्ये धक्कादायक घटना; कौटुंबिक वादातून हत्या केल्याचा आरोप
काशिनाथ शिंदे
हिंजवडी: कस्तुरी चौक परिसरातील सुखवाणी अंबर कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पमध्ये पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) पहाटे उघडकीस आली. अनिता कुमारी गोंड असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा पती राकेश सागर गोंड (वय ३०, रा. हिंजवडी, मूळ बिहार) याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अनिता हिचा मावस भाऊ रूपेश शंभू साव (वय ३८, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता गर्भवती होती. गर्भपात होऊ नये, या उद्देशाने ती बुधवारी रात्री कापूरमध्ये लवंग टाकून त्याची वाफ घेत होती. याचदरम्यान ती अर्धनग्न अवस्थेत खोलीबाहेर येऊन आरडाओरड करत असल्याचे आरोपीने सांगितले. त्यानंतर राकेश याने तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.







