लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यसंस्कारासाठी दोन लोखंडी रॅक बसविण्याची मागणी; आयुक्तांसह आमदार शंकरभाऊ जगताप यांच्याकडे साकडे
चिंचवड | प्रतिनिधी: काशिनाथ शिंदे
चिंचवड गावातील नागरिकांना पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी नगरसेवक तथा विधी समितीचे सदस्य श्री. शेखर बबनराव चिंचवडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. चिंचवड-काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीत लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोखंडी (बिडाचे) दोन रॅक बसवून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी आमदार शंकरभाऊ जगताप आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्मशानभूमीतील जागेची पाहणीही करण्यात आली आहे.
२४ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित
चिंचवड गावातील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी महाराज समाधी मंदिरापासून काही अंतरावर असलेली स्मशानभूमी अनेक पिढ्यांपासून चिंचवडकरांच्या पारंपरिक अंत्यसंस्काराचे ठिकाण होती. मात्र, सन २००२ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना पूर्वकल्पना न देता ही स्मशानभूमी हटविल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या घटनेला तब्बल २४ वर्षे उलटली, तरी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा पूर्णपणे उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी काळेवाडी, रावेत किंवा निगडी येथे जावे लागते.
विद्युत दाहिनी आहे; पारंपरिक सुविधेचीही गरज
चिंचवडकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चिंचवड-काळेवाडी पुलाजवळील चिंचवड हद्दीत सुमारे दोन वर्षांपूर्वी विद्युत दाहिनी सुरू करण्यात आली. ही सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरली असली, तरी विद्युत दाहिनी आणि लाकूड व गोवऱ्यांवर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची सुविधा या दोन स्वतंत्र गरजा आहेत. त्यामुळे विद्युत दाहिनी सुरू झाल्याने पारंपरिक अंत्यसंस्काराच्या सुविधेची आवश्यकता संपत नाही, अशी भूमिका चिंचवडे यांनी मांडली आहे.
धार्मिक भावना आणि परंपरेचा विचार करा!
हिंदू संस्कृतीत अंत्यसंस्काराला धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे. अनेक कुटुंबांना आपल्या धार्मिक परंपरेनुसार लाकूड व गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करायचे असतात. नागरिकांच्या धार्मिक भावना, परंपरा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन चिंचवड-काळेवाडी पुलाजवळील स्मशानभूमीत पारंपरिक अंत्यसंस्कारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता, चिंचवडकरांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भावनिक आणि सामाजिक प्रश्नाच्या दृष्टीने पाहावे. दोन लोखंडी रॅक बसविण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेखर चिंचवडे यांनी केली आहे.
२४ वर्षांपासून प्रलंबित असलेला चिंचवडकरांचा हा प्रश्न आता तरी मार्गी लागणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







