पुण्यातील बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर मंथन; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन
काशिनाथ शिंदे : पुणे
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुण्यातील शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अभियानाची दिशा, त्याची अंमलबजावणी आणि जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा कर्नाटकचे आमदार श्रीनिवास मानेगनी यांनी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भेट दिली. यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर काशिनाथ मारीमुत्तू, कार्याध्यक्ष वेंकटेश कोळी, सचिव बबन टोपे, किसान सेलचे अध्यक्ष संभाजी पिंजन आणि युवा नेते विष्णू नरसप्पा उपस्थित होते.
बैठकीत ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच अभियानाचा उद्देश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वयाने काम करावे, यावर भर देण्यात आला. अभियान यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि पुढील कार्यवाहीबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
‘मत वाचवा – देश वाचवा’ या घोषवाक्याच्या माध्यमातून लोकशाहीतील मतदानाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून, या अभियानाच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर भर दिला जात आहे.







