लायन्स क्लब निगडी प्राधिकरणाच्या स्पर्धेत किवळे विकासनगरच्या सभासदांची चमकदार कामगिरी
काशिनाथ शिंदे
किवळे : लायन्स क्लब निगडी प्राधिकरण यांच्या वतीने रविवारी, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक संघ, किवळे विकासनगरच्या सभासदांनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. या स्पर्धेत संघाचे सभासद दिलीप रोकडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सहचिटणीस माणिक येकाड यांनी द्वितीय आणि सचिव पंढरीनाथ सानप यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
भेळ चौकातून संभाजी चौकमार्गे बिना स्कूलपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत महिला व पुरुष मिळून सुमारे १५० स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होत आरोग्य, तंदुरुस्ती आणि सक्रिय जीवनशैलीचा संदेश दिला.
स्पर्धेतील विजेत्या दिलीप रोकडे, माणिक येकाड आणि पंढरीनाथ सानप यांचा लायन्स क्लब निगडी प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पदके देऊन सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ वयातही उत्साह, जिद्द आणि व्यायामाची आवड जपत तिन्ही सभासदांनी मिळविलेल्या या यशाबद्दल किवळे विकासनगर परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कामगिरीमुळे ज्येष्ठ नागरिक संघाचा नावलौकिक वाढला असून, इतर ज्येष्ठ नागरिकांनाही आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली आहे.







