नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचा प्रशासनाला इशारा; प्रकल्प रद्द करण्याची ठाम मागणी
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : रावेत येथे प्रस्तावित ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पावरून स्थानिक पातळीवर विरोधाची भूमिका तीव्र झाली आहे. नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि परिसरातील वाढती लोकवस्ती यांचा विचार न करता हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
रावेत परिसरातील ऐतिहासिक दुर्गा टेकडी, निवासी वसाहती आणि शैक्षणिक संस्थांच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे तरस यांनी म्हटले आहे. प्रकल्पामुळे वायुप्रदूषण, दुर्गंधी, ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
मोशी प्रकल्पाचा अनुभव घेतल्यानंतरच निर्णय घ्या!
रावेत येथील प्रस्तावित प्रकल्पाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, अशी मागणी तरस यांनी केली आहे. मोशी येथील विद्यमान प्रकल्प पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे कार्यरत झाल्यानंतरच नवीन प्रकल्पाबाबत विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
तसेच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, पर्यावरणतज्ज्ञ आणि संबंधित संरक्षण विभागाशी सविस्तर चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकल्पाचा स्वतंत्र पर्यावरणीय व सामाजिक परिणाम मूल्यांकन अहवाल (EIA) सार्वजनिक करून नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेणार नाही!
रावेतमधील नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षितता या बाबींना प्राधान्य देऊन महापालिका प्रशासनाने प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका ऐश्वर्या तरस यांनी मांडली आहे. प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पुढे रेटल्यास मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आता महापालिका प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि रावेतमधील प्रस्तावित प्रकल्पाबाबत कोणता निर्णय घेते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.







