येरवडा पोलिसांची धडक कारवाई; नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक बदलून राहत होता आरोपी
काशिनाथ शिंदे
पुणे (प्रतिनिधी) : येरवडा पोलीस ठाण्यात २००६ मध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी बीड जिल्ह्यातील परळी येथून अटक केली. नझीर मुस्तफा खान (वय ४६, रा. परळी, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार नाव, ओळख, राहण्याचे ठिकाण आणि मोबाईल क्रमांक बदलत असल्याची माहिती तपासात समोर आली.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
येरवडा पोलीस ठाण्यात २००६ मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३६६(अ) आणि ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. न्यायालयानेही त्याच्या फरार असण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.
फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचनेनुसार येरवडा पोलिसांचे तपास पथक त्याचा शोध घेत होते. या दरम्यान पोलीस अंमलदार संदीप जायभाय आणि साईनाथ मस्के यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी परळी येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
आरोपी पोलिसांना चकवा देण्यासाठी वारंवार आपली ओळख बदलत होता. तो वेगवेगळ्या ठिकाणी दोन-तीन दिवस गवंडीकाम करून पुन्हा राहण्याचे ठिकाण बदलत असल्याचेही समोर आले.
पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक
मिळालेल्या माहितीच्या आधारे येरवडा पोलिसांनी परळी पोलीस ठाण्याच्या स्थानिक मदतीने सापळा रचला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव नझीर मुस्तफा खान असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई आणि तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त रजनीकांत चिल्लूमुला, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक किशोर बेरड, पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड तसेच पोलीस अंमलदार संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, शैलेश वाबळे, गणेश पालवे, सोमनाथ गायकवाड, प्रशांत कांबळे, नटराज सुतार आणि संदीप धाडवड यांनी या कारवाईत सहभाग घेतला.







