धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या बाबी गावातील पोलीस शिपाईपदी अमृता शिंदेची भरारी; बाबी गावाने लेकीचा केला जाहीर सत्कार
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्याच्या बाबी गावातील पोलीस शिपाई पदी अमृता शिंदेची निवड झाल्याबद्दल बाबी गावाने वतीने शिंदेंच्या लेकीचा जाहीर सत्कार करण्यात आला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यशाचे शिखर गाठणाऱ्या बाबी (ता. वाशी) येथील कु. अमृता भागवत शिंदे हिची नाशिक मध्यवर्ती कारागृहात पोलीस शिपाई पदावर निवड झाल्याने संपूर्ण गावाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. गावच्या लेकीने मिळविलेल्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत तिचा जाहीर सत्कार करून कौतुकाचा वर्षाव केला.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित सत्कार समारंभात ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी फेटा, शाल आणि पुष्पहार देऊन अमृताचा सन्मान करण्यात आला. सत्कारावेळी उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.
साध्या ग्रामीण कुटुंबातून आलेल्या अमृताने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही मोठी स्वप्ने पाहून ती साकार करता येतात, असा विश्वास बळावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अमृताने आपल्या कर्तृत्वातून गावातील युवक-युवतींसमोर आदर्श निर्माण केला असून तिची यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अमृताच्या निवडीमुळे बाबी गावाचे नाव जिल्हाभरात गौरवाने घेतले जात आहे. शिंदे कुटुंबाच्या आनंदात संपूर्ण गाव सहभागी झाले असून, गावकऱ्यांनी तिच्या पुढील सेवाजीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. गावच्या लेकीने मिळविलेल्या या यशामुळे बाबी गावात सध्या उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
