काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ची धडाकेबाज कारवाई; येरवड्यातील आरोपीला बेड्या
पिंपरी-चिंचवड : घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने सुमारे १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत घरफोडी करणाऱ्या आरोपीचा माग काढला. या कारवाईत उत्तम प्रकाश गाढवे (वय ३६, रा. माणिकनगर, पोतेवस्ती, येरवडा, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून ४ लाख २४ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(३), ३३४ अन्वये गुन्हा दाखल असून गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-३चे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले.
पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामध्ये २ लाख २८ हजार ४१० रुपये किमतीच्या फ्लॅश वॉल पितळी ७० नग, ६७ हजार ६८ रुपये किमतीचे ड्रायव्हर पितळी २७ नग, ५४ हजार रुपये किमतीचे साईड वॉल स्पिकलर स्टेनलेस स्टील ३६० नग आणि ७५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण ४ लाख२४हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करून गुन्हेगारांचा माग काढण्याची पोलिसांची कार्यक्षमता अधोरेखित झाली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट-३चे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सोमणाथ बोऱ्हाडे, खेडकर, शशिकांत नागरे, समीर काळे, स्वप्निल महाले आदींच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला वेग देत गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याची गुन्हे शाखेची ही कारवाई शहरातील घरफोडी करणाऱ्यांसाठी इशारा ठरली आहे.







