काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
रावेत येथील इस्कॉन गोविंद धामच्या वतीने रविवारी (दि. १९ जुलै) भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या भव्य रथयात्रेचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेल्या या रथयात्रेत १५ हजारांहून अधिक भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर ‘जय जगन्नाथ’ आणि हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
रथयात्रेला सेलेस्टियल सिटी चौकातून प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गांवरून भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत रथयात्रेची सांगता इस्कॉन मंदिरात झाली. रथमार्गावर भाविकांसाठी महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
या सोहळ्याला पिंपरी-चिंचवडचे आमदार शंकर जगताप, अमित गव्हाणे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका ऐश्वर्या तरस, निलेश तरस, राजेंद्र तरस, विशाल मासुळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
रथयात्रेदरम्यान हरिनाम संकीर्तन, भक्तिगीते आणि अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी धार्मिक ग्रंथांचेही वितरण करण्यात आले.
रथयात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन, पोलिस मित्र, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. भाविकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करत सहकार्य केले.
इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष जगदीश गौरांग दास यांनी रथयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या पोलिस प्रशासन, स्वयंसेवक आणि सर्व भाविकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी भविष्यातही अशाच भक्तिमय वातावरणात धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.







