काशिनाथ शिंदे: लोणावळा
लोणावळा, : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘वृक्ष पंधरवडा’ उपक्रमाला लोणावळ्यात उत्साहात प्रारंभ झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने राबविला जात असून, यंदाही शहर परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्यासाठी लोणावळ्यातील बाळूमामा देवस्थान येथे दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर अंबरवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात महाआरती करून त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या वृक्ष पंधरवड्याचा शुभारंभ मच्छिंद्र खराडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक शंकर जाधव, माजी विभागप्रमुख सुरेश टाकवे, ज्ञानेश्वर जांभूळकर, सुनील इंगुळकर, विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष महेश खराडे, वाहतूक सेनेचे तालुका संघटक दिनेश वीर, नीलेश गोणते, विभागप्रमुख इंद्रजीत तिवारी, सदानंद पिल्लाने, युवा सेनेचे सतीश गोणते, अभिषेक इंगुळकर, विजय चौरे, सौरभ कडू, तेजस खराडे, संदीप यादव, श्रीकांत येवले, सुदेश टाकवे तसेच गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनंता देशमुख यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणारा हा वृक्ष पंधरवडा आगामी दिवसांत लोणावळा परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.







