काशिनाथ शिंदे : पुणे
आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि उद्योग क्षेत्रातील नव्या संधींचे दर्शन घडविणाऱ्या पुणे मशीन टूल एक्स्पो (PMTX) २०२६ आणि फॅक्टरी इक्विपमेंट एक्स्पो (FACTEQ) २०२६चे सोमवारी पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी येथे दिमाखात उद्घाटन झाले. इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IMTMA) यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुमारे ११ हजार चौरस मीटर क्षेत्रफळात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात १७५ हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. देश-विदेशातील सुमारे ३०० व्यावसायिक प्रतिनिधी तसेच १८ हजारांहून अधिक अभ्यागत प्रदर्शनाला भेट देणार आहेत. उत्पादन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, मशीन टूल्स, फॅक्टरी उपकरणे आणि विविध औद्योगिक समाधानांची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विकास टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अरविंद गोयल तसेच महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे कार्यकारी संचालक यांच्या हस्ते झाले.
या वेळी आयएमटीएमएच्या अध्यक्षा मोहिनी केळकर, उपाध्यक्ष विक्रम साळुंके तसेच महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिबाक दासगुप्ता उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मजबूत औद्योगिक परिसंस्था आणि पुण्याचे उत्पादन क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित करताना मोहिनी केळकर म्हणाल्या की, महाराष्ट्रात देशातील सर्वात मजबूत मशीन टूल उद्योग व्यवस्था आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांमध्ये महत्त्वाचे औद्योगिक समूह आहेत. पुणे हे ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग कंपन्यांचे प्रमुख केंद्र असल्याने उच्च अचूकतेच्या उत्पादन तंत्रज्ञानाची मोठी गरज आहे. ही गरज मशीन टूल उद्योग पूर्ण करीत आहे.
महाराष्ट्रात आयएमटीएमएचे सुमारे १८० सदस्य असून, गेल्या दोन दशकांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेकडून उद्योग क्षेत्राला सातत्याने सहकार्य केले जात असल्याचेही केळकर यांनी सांगितले.
जिबाक दासगुप्ता म्हणाले की, पुणे हे विविध उत्पादन उद्योगांचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे या भागातील उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमटीएक्स आणि फॅक्टेक या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आवृत्तीसोबत या प्रदर्शनांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून, मशीन टूल उत्पादक तसेच या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंपन्यांकडून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनामुळे उत्पादन क्षेत्रातील उद्योजक, तंत्रज्ञ, मशीन टूल उत्पादक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांना एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, व्यावसायिक संपर्क आणि नव्या उद्योग संधी उपलब्ध होणार आहेत.







