काशिनाथ शिंदे : किवळे
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बी झोनअंतर्गत एम. बी. कॅम्प, विकासनगर, किवळे येथील जुनी काँक्रीटची पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून वापरात नसलेली ही टाकी कधीही कोसळू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून धोकादायक टाकी तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.
टाकीला मोठमोठे तडे गेले असून काँक्रीटचा काही भाग उखडला आहे. पावसामुळे झालेली झीज, लोखंडी सळ्या उघड्या पडणे आणि कमकुवत झालेली रचना यामुळे ती धोकादायक बनली आहे. विशेष म्हणजे टाकीच्या खाली पाईप, बांबू व इतर साहित्य ठेवण्यात आले असून परिसरात नागरिक, लहान मुले आणि पादचाऱ्यांची सतत वर्दळ असते.
यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. “दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही धोकादायक पाण्याची टाकी तातडीने हटवावी,” अशी ठाम मागणी श्रीजित रमेशन यांनी केली आहे.
आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाची किती तत्परतेने दखल घेते, याकडे किवळेकरांचे लक्ष लागले आहे.







