काशिनाथ शिंदे: लातूर
हरवलेला मोबाईल परत मिळणे हे अनेक नागरिकांसाठी अशक्यप्राय वाटत असते. मात्र लातूर शहर पोलिसांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी समन्वयाच्या जोरावर तब्बल ७६ हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत तांत्रिक तपास, उपलब्ध माहितीचे विश्लेषण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून विविध पोलीस ठाण्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या मोहिमेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याने २५, एमआयडीसी पोलीस ठाण्याने २१, विवेकानंद चौक पोलीस ठाण्याने १४ आणि गांधी चौक पोलीस ठाण्याने १६, असे एकूण ७६ मोबाईल फोन शोधून काढले.
दि. ३० जुलै २०२६ रोजी लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत लातूर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
लातूर पोलिसांनी ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस अंमलदार लक्ष्मण कांदे (शिवाजीनगर), पोलीस निरीक्षक समाधान चवरे व पोलीस अंमलदार अक्षय डिगोळे (एमआयडीसी), पोलीस निरीक्षक अरविंद पवार व पोलीस अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर (विवेकानंद चौक), तसेच पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड व पोलीस अंमलदार योगेश चिंचोलीकर (गांधी चौक) यांनी विशेष परिश्रम घेतले.







