काशिनाथ शिंदे : मुंबई
मुंबई : द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय)च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल (डब्ल्यूआयआरसी)च्या सन २०२६-२७ या कार्यकाळासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए) महेंद्र भोंबे यांची अध्यक्षपदी, विवेक भालेराव यांची उपाध्यक्षपदी, तर मनीषा अग्रवाल यांची मानद सचिव तथा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मुंबई येथील वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या कार्यालयात ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या विशेष कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष सीएमए मिहीर नारायण व्यास यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सीएमए महेंद्र भोंबे यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या पाच राज्यांसह दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या विस्तृत विभागातील कॉस्ट अकाउंटंट्सच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण, कौशल्यविकास, उद्योग क्षेत्राशी समन्वय तसेच सदस्याभिमुख विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी नव्या नेतृत्वावर असणार आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे कॉस्ट अकाउंटन्सी क्षेत्रातून स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली डब्ल्यूआयआरसी अधिक सक्षम, गतिमान आणि सदस्यकेंद्रित कामकाज करत व्यावसायिक उत्कृष्टतेला नवी दिशा देईल, असा विश्वास विविध मान्यवरांनी व्यक्त केला.







