काशिनाथ शिंदे: पिंपरी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला “लोकनेते अजितदादा पवार मिसिंग लिंक महामार्ग” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात वरखडे यांनी म्हटले आहे की, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा देशातील अत्याधुनिक आणि अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून सातत्याने निधी उपलब्ध करून दिला. तसेच प्रशासकीय मान्यता, भूसंपादन आणि विविध तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत प्रकल्पाला गती दिली, असेही त्यांनी नमूद केले.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे मार्गावरील लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, वेळ व इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होईल. तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीत अजित पवार यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी या महामार्गाला “लोकनेते अजितदादा पवार मिसिंग लिंक महामार्ग” असे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी विनोद वरखडे यांनी केली आहे.







