काशिनाथ शिंदे : पिंपरी
कासारवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांना अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, आरोपींनी त्याच्या अॅक्टिव्हा दुचाकीचीही तोडफोड केली. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कासारवाडी येथील महादेव मंदिरासमोरील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. याप्रकरणी रेहमान जब्बार सिद्दिकी (वय १९, रा. कासारवाडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, रेहमान आणि त्यांचा मित्र अभिषेक हे अॅक्टिव्हा दुचाकीवरून जात असताना जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी मोहम्मद शेख, अमन बागवान आणि समीर यांनी त्यांचा रस्ता अडवला. आरोपींनी शिवीगाळ करत अभिषेकच्या गालावर चापट मारली आणि त्यानंतर तिघांनी मिळून हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. झटापटीदरम्यान अभिषेकच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली, तसेच डोक्यावर कठीण वस्तूने वार करून त्याला जखमी करण्यात आले.
हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या नावावर असलेल्या होंडाअॅक्टिव्हा(एमएच१४बीझेड ६५७२) या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी दापोडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 118(1), 324(2), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.







