काशिनाथ शिंदे : सांगली
सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे. या धडक कारवाईत ११ देशी बनावटीची पिस्टल, २२ जिवंत काडतुसे, दोन स्पेअर मॅगझीन असा तब्बल ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र व्यवहाराला मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७३/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध आर्म अॅक्ट कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने प्रथममयुरेश मनोहर आदाटे (रा. विटा, ता. खानापूर) याला नेलकरंजी फाटा येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
सखोल चौकशीत आदाटे याने ही पिस्टल मारुती अशोक गुजले (रा. जांभूळमळा, ता. खानापूर) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी खरसुंडी परिसरात सापळा रचून गुजले याला अटक केली. त्याच्याकडून तीन पिस्टल, सहा जिवंत काडतुसे आणि एक वायरीची पिशवी जप्त करण्यात आली.
यानंतरच्या चौकशीत मारुती गुजले याने ही शस्त्रे वैभव ऊर्फ गब्बर संजय इंगळे (रा. ताडाचीवाडी, ता. खानापूर) याच्याकडून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आटपाडीजवळील स्वादिष्ट मच्छीफ्राय सेंटर परिसरात सापळा रचून वैभव इंगळे याला अटक केली. त्याच्याकडून उर्वरित शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत एकूण ११देशीबनावटीचीपिस्टल, २२ जिवंत काडतुसे, दोन स्पेअर मॅगझीन, एक काळी सॅक आणि एक वायरीची पिशवी असा ७.६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपींनी ही शस्त्रे मध्यप्रदेशातील ‘पाजी’ नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली असून, त्या संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.
ही यशस्वी कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार संजय पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सायबर पोलीस ठाणे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.







