काशिनाथ शिंदे : पुणे
पुण्यातील आंबेगाव परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ गावठी अग्निशस्त्रे आणि १ जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ₹१ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जांभुळवाडी पाझर तलावाजवळील मोकळी जागा, जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द येथे तिघे जण अग्निशस्त्रांसह थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
गोपनीय माहितीच्या आधारे आंबेगाव पोलिसांनी सापळा रचून राजन विनोद शहा, अनिल कैलास चौधरी आणि प्रथम अरुण रेणुसे यांना ताब्यात घेतले.
या तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. शस्त्रे त्यांच्याकडे कुठून आली आणि त्यांचा पुढे काय वापर होणार होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.







