काशिनाथ शिंदे : पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्रात आदिवासी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रद्द करण्यात आलेले प्रवेश तातडीने पूर्ववत करावेत, तसेच केंद्राचे संचालक व समन्वयक यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद (आठवले गट) यांच्या वतीने मंगळवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांच्या दुहेरी प्रवेशाच्या मुद्द्यावरून विद्यार्थी संघटनेने आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. केंद्राचे संचालक एकाच वेळी अनेक विभागांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळून त्याचा आर्थिक लाभ घेत असतील, तर विद्यार्थ्यांनी दुहेरी प्रशिक्षण घेऊन आपली बौद्धिक क्षमता आणि स्पर्धात्मक गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आक्षेप का, असा सवाल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याऐवजी दुहेरी प्रवेशाच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांवर कारवाई करणे अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेने केला. तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राच्या कारभारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा अभाव असल्याचा आरोप करत संचालक व समन्वयक यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे रद्द झालेले प्रवेश तातडीने पूर्ववत करावेत, त्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करावे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान व न्याय्य शैक्षणिक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे उल्लंघन होऊ नये आणि विद्यापीठाची प्रतिष्ठा व विश्वासार्हता अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.







