काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
थरमॅक्स चौकातील एका नामांकित केक शॉपमधून खरेदी केलेल्या चॉकलेट पेस्ट्रीमध्ये काचेप्रमाणे दिसणारा कठीण तुकडा आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहक महिलेने केला आहे. मुलीसाठी आणलेली पेस्ट्री खात असताना हा प्रकार लक्षात आल्याचे महिलेने सांगितले. या घटनेनंतर दुकानदाराला जाब विचारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, पेस्ट्री खात असताना तिच्या तोंडात छोटा, कठीण आणि काचेप्रमाणे दिसणारा तुकडा आला. त्यानंतर तिने पेस्ट्री खाणे तातडीने थांबवले. सुदैवाने हा तुकडा गिळला गेला नसल्याने संभाव्य धोका टळला. मात्र, लहान मुलांसाठी विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात अशा प्रकारचा संशयास्पद तुकडा आढळल्याने महिलेने संताप व्यक्त केला.
या प्रकारानंतर संबंधित महिलेने केक शॉपमध्ये जाऊन दुकानदाराकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. यावेळी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, पेस्ट्रीमध्ये आढळलेला तुकडा प्रत्यक्षात काचेचा आहे की अन्य कोणत्या पदार्थाचा, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे केवळ व्हिडिओ किंवा ग्राहकाच्या आरोपावरून निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
अन्नसुरक्षा विभागाच्या तपासणीची मागणी
या प्रकरणाची अधिकृत चौकशी करून संबंधित पेस्ट्रीचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यात यावा, तसेच केक शॉपमध्ये खाद्यपदार्थांची निर्मिती, हाताळणी, पॅकिंग आणि साठवणुकीदरम्यान आवश्यक अन्नसुरक्षा नियमांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
नमुना तपासणी आणि संबंधित विभागाच्या चौकशीनंतरच पेस्ट्रीमध्ये आढळलेला तुकडा नेमका कशाचा होता आणि त्याबाबतची जबाबदारी कोणाची आहे, हे स्पष्ट होणार आहे.







