काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
मोशी येथील दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत महापौर रवि लांडगे यांनी माणुसकीचा हात पुढे केला. वाढदिवसाचा जल्लोष टाळून कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये, अशी एकूण ९ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
मोशी दुर्घटनेने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरले असून, नऊ कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याऐवजी दुःखाच्या काळात या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका महापौर रवि लांडगे यांनी घेतली.
कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भावेश वाणी, अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. पत्रकार परिषदेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका योगिता नागरगोजे, राहुल लांडगे तसेच संबंधित कुटुंबीय उपस्थित होते.
“दुःखात असलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ”
महापौर रवि लांडगे म्हणाले, “वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो; मात्र आपल्या शहरातील नऊ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना वाढदिवसाचा जल्लोष करणे मनाला पटणारे नाही. आपल्या माणसांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच माझ्यासाठी वाढदिवसाचा खरा अर्थ आहे.”
“आर्थिक मदतीने त्यांच्या प्रिय व्यक्तीची उणीव कधीही भरून निघणार नाही. मात्र, या कठीण काळात ‘तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत’, हा विश्वास देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे,” असेही त्यांनी सांगितले.
कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू, वंचित आणि संकटग्रस्त नागरिकांना यापुढेही शक्य ती मदत करण्याचे कार्य सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
वाढदिवसाचा आनंद काही क्षणांचा; मात्र दुःखाच्या काळात दिलेला आधार आयुष्यभर स्मरणात राहतो. माणुसकी जपत संकटात असलेल्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हाच यंदाच्या वाढदिवसाचा संकल्प असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले.







